Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Esther 4 >> 

1जे काही झाले ते मर्दखयाच्या कानावर आले. यहूद्यांविरुध्द राजाने काढलेला हुकूम त्याला समजला तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. गोणताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासून तो नगरातून मोठयाने आक्रोश करत आणि रडत निघाला.

2पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला. कारण गोणताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजव्दारातून आत जाण्यास मनाई होती.

3राजाचा हुकूम ज्या ज्या प्रांतात पोचला तेथे तेथे यहूद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि गोणताटाची वस्त्रे घालून बहुतेक यहूदी राखेत पडून राहिले.

4एस्तेरच्या दासी आणि तिचे सेवक खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयाविषयी सांगितले. तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. गोणताटाच्या ऐवजी घालायला तिने मर्दखयाकडे वस्रे पाठवली. पण त्यांने ती स्विकारली नाहीत.

5एस्तेरने मग हथाकाला बोलावले. हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एक जण होता. आणि हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्याला आज्ञा दिली.

6तेव्हा राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला.

7मर्दखयाने मग त्याला जे घडले ते सर्व सांगितले. यहूद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हामानाने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले.

8यहूद्यांच्या वधाची आज्ञा शूशन नगरात दिली होती त्या राजाज्ञेची प्रतही तिला दाखवण्यासाठी दिली. एस्तेरने राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची याचना व विनंती करावी ही जबाबदारी त्याने तिच्यावर सोपवली.

9हथाकाने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखयाने जे सांगितले ते सर्व कळवले.

10मग मर्दखयासाठी एस्तेरने हथाकाजवळ निरोप दिला:

11“मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री राजाचा एकच कायदा आहेः तो म्हणजे मृत्युदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या माणसाला जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.”

12मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला.

13मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यहूदी लोकांतून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस.

14तू आत्ता गप्प बसलीस तर यहूद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल. पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. आणि कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”

15तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले:

16“जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले.”

17तेव्हा मर्दखय निघून गेला. एस्तेरने त्याला जे करायला सांगितले तसे त्याने केले.



 <<  Esther 4 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran