Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Thessalonians 1 >> 

1देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल ,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः

2देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.

3बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे,आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;

4ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमची प्रशंसा करतो.

5ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.

6तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,

7म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.

8तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.

9तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.

10आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून, आणि त्या दिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल,कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.

11ह्याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या ह्या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;

12ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी, व तुम्हाला त्याच्याठायी, गौरव मिळावे.



 <<  2 Thessalonians 1 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran