1आणि पलिष्टी इस्राएलाविरूध्द लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल माणसाने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
2पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे मुलगे यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या मुलांना पलिष्ट्यांनी मारले.
3शौलाविरूध्द त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्याला गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
4नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत:ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
5जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेहि तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
6अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन मुलगे, व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
7जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल माणसाने पाहिले की, शौल व त्याचे मुलगे मेले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यात राहू लागले.
8मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले.
9त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांना कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
10त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
11पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
12तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनीक शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
13शौल परमेश्वराशी अविश्र्वासू होता म्हणून त्याला मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना पाळल्या नाहीत, परंतु कोणीतरी मेलेल्याबरोबर बोलतो त्याकडे सल्ला विचारण्यास गेला.
14त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्याला मारले आणि इशायाचा मुलगा दावीद याच्याकडे राज्य सोपवले.
<< 1 Chronicles 10 >>