Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Corinthians 13 >> 

1मी मनुष्यांच्या आणि व देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.

2आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.

3आणि मी जरी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.

4प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.

5प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.

6प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.

7प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.

8प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;

9कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.

10पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.

11जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.

12आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,

13सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतातः पण यात प्रीती श्रेष्ठ आहे.



 <<  1 Corinthians 13 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran