Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Zechariah 11 >> 

1लबानोना, अग्नीने आत शिरुन तुझे गंधसरु जाळून टाकावीत म्हणून तू आपली दारे उघड.

2गंधसरु उन्मळून पडला आहे म्हणून हे देवदार वृक्षांनो आक्रोश करा. जे श्रेष्ठ होते ते नाश झाले आहे! बाशानाच्या ओक वृक्षांनो, विलाप करा कारण घनदाट अरण्य भूसपाट झाले आहे.

3रडणाऱ्या मेंढपाळांचा आक्रोश ऐका. त्यांचे गौरव नाहीसे झाले आहे; तरुण सिंहाच्या गर्जना ऐका कारण यार्देन नदीकाठची दाट झुडुपे लयास गेली आहे.

4तर परमेश्वर माझा देव, म्हणतो, “ठार मारण्यासाठी नेमलेल्या मेढरांची काळजी घे.

5त्यांचे मालक त्यांना ठार मारतात आणि स्वत:ला दोषी मानत नाही. ते त्यांना विकतात आणि म्हणतात, ‘परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो आहे!’ त्यांच्या स्वतःच्या मेंढपाळांना त्यांची दया आली नाही.

6मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल यापुढे दु:ख होणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो. “पाहा! मी त्यांना एकमेकांच्या व राजाचा तावडीत देईन; आणि याप्रकारे ते देशाचा नाश करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडविणार नाही.”

7म्हणून मी त्या ठार मारण्यासाठी नेमलेल्या कळपाचा मेंढपाळ झालो. त्यांच्यातील अगदी मरणास टेकलेल्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एका काठीला मी रमणीयया व दुसरीला ऐक्य असे नाव दिले. मग मी त्या कळपाची निगा राखण्यास सुरवात केली.

8एका महिन्यात मी तीन मेंढपाळांचा नाश केला. कारण मला त्या मेंढपाळांचा कंटाळा आला व त्यांचा जीव माझा तिरस्कार करू लागला.

9मग मी म्हणालो, “आता मी तुमचा सांभाळ करणार नाही. जी मरायला टेकली आहेत ती मरोत; कोणी नष्ट झाले तर होऊ द्या; आणि जी वाचतील ती एकमेकांची मांस खातील.”

10मग मी ‘रमणीयता’ नावाची काठी उचलली आणि मोडली. सर्व वंशांचा देवाशी झालेला करार मोडल्याचे मी यावरुन सूचित केले.

11म्हणून त्या दिवसापासून करार संपुष्टात आला आणि त्या कळपातील माझ्याकडे निरखून पाहणारे अतिशय अशक्तांची खात्री पटली की हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.

12मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझी मजूरी द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली.

13तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्या लेखी तुझी जी किंमत आहे, ती रक्कम तू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली.

14मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तुकडे केले जेणेकरून यहूदा आणि इस्राएल यांच्यामधील बंधुत्त्व मोडावे.

15मग परमेश्वर मला म्हणाला, “आता, पुन्हा एका मूर्ख मेंढपाळाची अवजारे घे.

16पाहा, मी ह्या देशासाठी नवीन मेंढपाळ निवडीन. पण तो नाश पावणाऱ्या मेढरांची काळजी घेणार नाही. भटकलेल्या मेढरांना तो शोधणार नाही, मोडलेल्यांना बरे करणार नाही. ज्या मेंढ्या पोसलेल्या आहेत त्यांना तो चारापाणी देणार नाही. तर तो सशक्त मेंढ्यांचे मांस खाईल आणि फक्त त्यांचे खूर शिल्लक ठेवील.”

17मेंढरांना टाकून जाणाऱ्या निरुपयोगी मेढपाळाचा धिक्कार असो! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवार येवो. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होवो आणि तो उजव्या डोळ्याने अंध होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Zechariah 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran