Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Zechariah 1 >> 

1पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे:

2परमेश्वर तुमच्या पुर्वजांवर फार रागावला होता.

3तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

4संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरीतींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.

5“तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टेदेखील सर्वकाळाकरीता येथे राहतील काय?

6परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले, ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?” तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, “सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पुर्णतेस नेल्या आहेत.”

7दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा:

8“रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.”

9मी विचारले, “प्रभु, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”

10मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या माणसाने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.”

11नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.”

12मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरुशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?”

13माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला.

14मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: “मी यरुशलेम व सियोन यांच्यासाठी अतिइर्षावान असत आलो आहे!

15आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे; कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.”

16म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरुशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापणसूत्र यरुशलेमेवर लावण्यात येईल.”

17पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरुन वाहतील, परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरुशलेमची निवड करीन.”

18मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली!

19माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”

20मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.

21मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांना विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करु दिले नाही. परंतू त्या शिगांना ते घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Zechariah 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran