Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 1 >> 

1आणि परमेश्वराचा सेवक मोशे, याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा मुलगा यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस, याच्याशी परमेश्वर बोलला,

2माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही ही यार्देन ओलांडून जा, जो देश मी इस्राएल लोकांस देत आहे त्यात जा.

3मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या-ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते-ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.

4रान व हा लबानोन यापासून महानदी फरातपर्यतचा हित्ती याचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यतचा प्रदेश तुमचा होईल.

5तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.

6बलवान हो आणि धैर्य धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.

7मात्र तू खूप शूर व निर्भय हो आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील.

8नियमशास्त्राच्या या पुस्तकाबद्दल नेहमी बोलत जा; दिवस आणि रात्र त्यावर मनन कर, यासाठी की त्यात जे काही लिहीले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.

9मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.

10मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,

11छावणीतून फिरून लोकांना अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे.

12मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश यांना म्हटले,

13परमेश्वराचा सेवक मोशे याने तुम्हांला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.

14या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हांला दिला आहे त्यांतच तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे यांनी राहावे, पण तुम्ही सर्व योद्धयांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवापुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी.

15परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.

16तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हाला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.

17जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.

18जो कोणी तुझ्या आज्ञेविरूध्द बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्याला देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran