Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 59 >> 

1पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.

2तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हांला तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे. आणि तुमच्या पापांनी त्याला आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.

3कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटळली आहेत. तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते.

4कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही. ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईचे गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात.

5ते विषारी सापाची अंडी उबवीतात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.

6त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाही. त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.

7त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात, आणि निष्पाप रक्त पाडयला ते घाई करतात. त्यांचे विचार हे अन्यायाचे विचार आहेत, हिंसा आणि नाश हे त्यांचे मार्ग आहेत.

8त्यांना शांतीचा मार्ग माहित नाही, आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही. त्यांनी कुटिल मार्ग स्थापिले, आणि जो कोणी या मार्गात प्रवास करतो तो शांतता ओळखत नाही.

9यास्तव न्याय आम्हापासून दूर आहे, आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहचत नाही. आम्ही प्रकाशासाठी थांबतो, पण पाहा अंधार; आम्ही तेज शोधतो, पण आम्ही काळोखात चालतो.

10आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्यांप्रमाणे जे पाहू शकत नाही. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दूपारी पडतो; बलवानांमध्ये आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे आहो.

11आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो, आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतू ते आम्हापासून फार दूर आहे.

12कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरुद्ध साक्ष देतात. कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत, आणि आम्हांस आमची पातके माहीत आहेत.

13आम्ही बंड केले, परमेश्वराला नकारले आणि आमच्या देवाला अनूसरण्याचे सोडून दूर फिरलो आहे. आम्ही खंडणी बद्दल बोललो आणि बाजूला वळलो आहो, वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.

14न्यायस मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे. सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे, आणि सरळपण आत येऊ शकत नाही.

15सत्य जात राहले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात. परमेश्वराने पाहिले पण त्याला कोठेच चांगुलपणा सापडला नाही, परमेश्वराला हे आवडले नाही.

16त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थहि नाही. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले, आणि त्याच्याच न्यायीपणाने त्याला आधार दिला.

17त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले, त्याने सूडाचे वस्र परिधान केले आणि जसा झग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता.

18त्यांच्या कृत्यांप्रमाणेच तो त्यांना परतफेड करील, त्याच्या शत्रूस क्रोध, वैऱ्यास प्रतिफल भरून देईल, द्वीपांना दंड म्हणून त्यांचा प्रतिफळ देईल.

19ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्याउदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील.

20मग तारणारा सियोनाकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेहि येईल, परमेश्वर असे म्हणतो.

21परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शद्ब जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या संतानाच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 59 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran