Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 49 >> 

1दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो, माझे म्हणणे ऐका. जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.

2परमेश्वर त्याचे म्हणणे माझ्याकडून वदवितो. तो माझा उपयोग धारदार तलवारीसारखा करतो. त्याच्या ओंजळीत मला लपवून तो माझे रक्षणही करतो. परमेश्वर टोकदार बाणाप्रमाणे माझा उपयोग करतो, पण तो त्याच्या भाल्यात मला लपवितोही.

3परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”

4मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली. स्वत: झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही. मी माझी सर्व शक्ती खर्च केली पण माझ्याहातून काहीच झाले नाही. तेव्हा आता काय करायचे. ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे. देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.

5मी परमेश्वराचा सेवक व्हावे, याकोबला आणि इस्राएलला मी परत देवाकडे न्यावे, म्हणून मला देवाने जन्माला घातले. परमेश्वर माझा सन्मान करील. मला देवाकडून शक्ती मिळेल.”परमेश्वर मला म्हणाला,

6“तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस. इस्राएलचे लोक कैदी आहेत. पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल. याकोबच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल. पण तुझे काम दुसरेच आहे, ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे. मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन. जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”

7परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव, इस्राएलला वाचवितो देव म्हणतो, “माझा सेवक नम्र आहे. तो अधिपतींची सेवा करतो पण लोक त्याचा तिरस्कार करतात पण राजे त्याला पाहतील आणि उभे राहून त्याला मान देतील. मोठे नेते त्याच्यापुढे वाकतील.” परमेश्वराला, इस्राएलाच्या पवित्र देवाला हे व्हायला पाहिजे आहे म्हणून असे घडेल, परमेश्वर विश्वासू आहे. ज्याने तुला निवडले तोच तो आहे.

8परमेश्वर म्हणतो, “माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल. त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन. तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल. तेव्हा मी तुला मदत करीन. मी तुझे रक्षण करीन. माझा लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील. देशाचा आता नाश झाला आहे पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील.

9तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील ‘अंधारातून बाहेर या’ प्रवास करताना लोकांना खायला मिळेल. ओसाड टेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल.

10लोक उपाशी राहणार नाहीत. ते तहानेलेही राहणार नाहीत. तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत. का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.

11“मी माझ्या लोकांसाठी रस्ता तयार करीन. डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.

12“पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. मिसरमधील सीनीहूनही (आस्वानहूनही) लोक येत आहेत.”

13हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा. डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो. गरिबांवर तो दया करतो.

14पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभु मला विसरला.”

15पण मी म्हणतो, “आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही. आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही. आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही आणि मी (परमेश्वर) तुला विसरू शकत नाही.

16पाहा! मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे. मी नेहमी तुझाच विचार करतो.

17तुझी मुले तुझ्याकडे परत येतील. लोकांनी तुझा पराभव केला पण ते लोक तुला एकटी सोडतील.”

18वर पाहा, तुमच्या सभोवती पाहा. तुझी मुले एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वर म्हणतो, “मी प्रत्यक्ष आहे आणि मी तुला पुढील गोष्टींचे वचन देतो. तुझी मुले गळ्यात शोभून दिसणाऱ्या रत्नांप्रमाणे होतील. नववधूने गळ्यात घालायच्या हाराप्रमाणे ती होतील.

19आता तुझा नाश केला गेला आहे आणि तुझा पराभव झाला आहे. तुझा देश कुचकामी आहे. पण थोड्या काळानंतर, तुझ्या भूमीवर खूप खूप लोक असतील. तुझा नाश करणारे खूप दूर जातील.

20तुझ्या हरवलेल्या मुलांसाठी तू दु:खी झालीस. पण ती मुले तुला म्हणतील, “ही जागा फारच लहान आहे. आम्हाला राहायला मोठी जागा दे.’

21मग तू मनाशी म्हणशील, ‘ही सर्व मुले मला कोणी दिली? हे फार चांगले आहे. मी दु:खी होते आणि एकटी होते. माझा पराभव केला गेला आणि मला माझ्या माणसांपासून दूर केले गेले. मग ही मुले मला कोणी दिली? पाहा मला एकटी सोडले, ही सर्व मुले कोठून आली?”‘

22परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांना दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन नंतर ते तुझी मुले तुझ्याकडे आणतील. ते त्यांना खांद्यांवरून आणि हातांतून आणतील.

23राजे तुझ्या मुलांचे शिक्षक असतील. राजकन्या त्यांची काळजी घेतील. ते राजे व राजकन्या तुझ्यापुढे वाकतील. ते तुझ्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावतील. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे. आणि माझ्यावर जो विश्वास ठेवतो त्याची निराशा होत नाही.”

24जेव्हा एखादा शूर वीर युध्दात संपत्ती जिंकतो, तेव्हा तुम्ही ती त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही. जेव्हा एखादा बलवान शिपाई तुरूंगावर पहारा करतो तेव्हा कैदी तुरूंगातून निसटू शकत नाही.

25पण परमेश्वर म्हणतो, “कैदी पळून जातील. कोणीतरी त्यांना त्या कडक पहाऱ्यातून दूर नेईल. हे कसे होईल? तुझी लढाई मी लढेन. मी तुझ्या मुलांना वाचवीन.

26“त्या लोकांनी तुला दुखावले पण त्यांना स्वत:चेच मांस खायला मी लावीन. स्वत:च्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल. मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल याकोबच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 49 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran