Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 2 >> 

1आमोजचा मुलगा यशया याला यहुदा व यरूशलेम यांच्या बद्दल दृष्टान्त झाला.

2शेवटच्या दिवसात, परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल. तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल. सर्व देशांतील लोक तेथे जातील.

3पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.” देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.

4नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.

5याकोबच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या.

6तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे.

7दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत.

8तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात.

9दिवसेंदिवस लोक वाईट होत चालले आहेत. ते नीच पातळीवर पोहोचले आहेत. देवा, तू नक्कीच त्यांना क्षमा करणार नाहीस. हो ना?

10येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.

11गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. तेव्हा फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.

12परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्यादिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल.

13जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.

14हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व

15उंच मनोरे आणि उंच भक्कम भिंतीप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.

16हे गर्विष्ठ लोक तार्शीशहूनयेणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील.

17त्यावेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील.

18सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील.

19लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.

20त्यावेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.

21मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.

22जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran