Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 39 >> 

1यहूदाचा राजा सिद्कीया याच्या नवव्या वर्षात आणि दहाव्या महिन्यात, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमाविरूद्ध चालून आला आणि त्याला वेढा घातला.

2सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले.

3मग बाबेलच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेमेत आले आणि मधल्या दरवाजाजवळ बसले. नेर्गल शरेसर, समगार नबो, व सर्सखीम हे महत्वाचे अधिकारी होते. नेर्गल शरेसर हा उच्च अधिकारी होता. आणि इतर सर्व बाबेलचे अधिकारी होते.

4असे झाले की, जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया आणि त्याच्या लढाऊ माणसांनी त्यांना पाहिले, ते पळून गेले. ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने नगरातून तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून निघून गेले. राजा अराबाकडच्या मार्गाने निघून गेला.

5पण खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून आणि यार्देन नदीच्या खोऱ्याच्या मैदानात यरिहोच्याजवळ सिद्कीयाला गाठले. मग त्यांनी त्याला पकडले आणि हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे आणले, जेथे नबुखद्नेस्सराने त्याच्यावर शिक्षा ठरविली.

6रिब्लामध्ये, बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, त्याच्या स्वतःच्या मुलांना जिवे मारले; त्याने यहूदातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा जिवे मारले.

7मग त्याने सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला बाबेलाला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले.

8नंतर खास्द्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्यांनी यरुशलेमेची तटबंदी फोडली.

9राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान ह्याने नगरामध्ये राहिलेल्या लोकांना, जे लोक खास्द्यांना सोडून गेले होते आणि जे कोणी नगरात उरलेले लोक होते त्यात यांचा समावेश आहे, त्यांना कैदी करून बाबेलास नेले.

10पण राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने ज्यांच्याजवळ स्वतःचे काहीच नव्हते अशा गरीब लोकांना यहूदा देशात राहण्याची परवानगी दिली. त्याने त्याच दिवशी त्यांना द्राक्षमळे व शेते दिली.

11बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यिर्मयाच्या बाबतीत, राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदानाला ताकीद दिली होती; तो म्हणाला,

12“त्याला घेऊन व त्याची काळजी घे. त्याला इजा करु नको. तो जे काही सांगेल ते त्याच्यासाठी कर.”

13म्हणून राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने, नबूशजबान या उच्च अधिकारी, नेर्गल शरेसर या उच्च अधिकाऱ्याला आणि बाबेल राज्यातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविले.

14त्यांच्या माणसांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्याला घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला.

15आता तो यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात कैदेत असताना परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,

16एबद-मलेख कूशीशी बोल आणि सांग, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतोः पाहा, मी माझी वचने या नगराविरूद्ध अरिष्टासाठी आणील आणि चांगल्यासाठी नाही. त्या दिवशी त्या सर्व तुझ्यासमक्ष खऱ्या होतील.

17पण, मी तुला त्यादिवशी वाचवीन. असे परमेश्वर म्हणतो. आणि तू ज्यांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही.

18कारण मी तुला खात्रीने वाचवीन.तू तरवारीने पडणार नाहीस. तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. असे परमेश्वर म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 39 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran