Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 27 >> 

1यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या राजाच्या आरंभी हे वचन परमेश्वरापासून यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,

2परमेश्वर मला जे काय म्हणाला, ते हे तू आपल्यासाठी बंधने व जोखड तयार कर. ते आपल्या मानेवर ठेव.

3मग यरुशलेमेला, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जे दूत येतात त्यांच्या हातून अदोमाच्या राजाकडे व मवाबाच्या राजाकडे, अम्मोन लोकांच्या राज्याकडे, सोराच्या राजाकडे, सीदोनाच्या राजाकडे ती पाठव.

4त्यांच्या मालकाला सांगण्यासाठी त्यांना आज्ञा कर आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपल्या मालकास असे सांगा की,

5मी आपल्या महासामर्थ्याने आणि आपले भूज उभारून पृथ्वी निर्माण केली. मी पृथ्वी व तीवरील प्राणीसुद्धा निर्माण केले आणि माझ्या दृष्टीने जो कोणी योग्य आहे त्याला मी देतो.

6म्हणून आता, मी सर्व देश बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, माझा सेवक ह्याच्या हाती दिले आहेत. त्याची सेवा करायला मी वन्य प्राणीसुद्धा दिले आहेत.

7आणि त्याच्या देशाची वेळ येईपर्यंत सर्व राष्ट्रे त्याची, त्याच्या मुलाची आणि त्याच्या मुलांच्या मुलांची सेवा करतील. मग अनेक राष्ट्रे व महान राजे त्याच्याकडून आपली सेवा करून घेतील.

8म्हणून जे राष्ट्रे आणि राज्ये बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराची सेवा करणार नाही आणि बाबेलाचा राजा याच्या जोखडाखाली आपली मान देणार नाही, त्याला मी त्याच्या हातून नाहीसे करीपर्यंत, तरवारीने, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करीन. असे परमेश्वर म्हणतो.

9आणि तुम्ही आपले संदेष्टे, आपले दैवज्ञ, आपले स्वप्नद्रष्टे आणि आपले मांत्रिक आणि आपले जादूगार, जे तुम्हाला म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, त्यांचे तुम्ही ऐकू नका.

10कारण मी तुम्हाला तुमच्या देशातून दूर न्यावे, कारण मी तुम्हास काढून टाकावे आणि तुम्ही मरावे म्हणून ते खोटे भविष्य सांगतात.

11“पण जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करील आणि आपली मान त्याच्या जोखडात देईल त्या राष्ट्रांना मी त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि ते तिची मशागत करतील व त्यात आपले घरे करतील.” असे परमेश्वर म्हणतो.

12म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याशी बोललो आणि त्याला हा संदेश दिला. “ तुम्ही आपल्या माना बाबेलाच्या राजाच्या जोखडात द्या आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.

13जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करण्यास नकार देतील, त्याविषयी परमेश्वराने जसे जाहीर केले तसे तू आणि तुझे लोक तरवारीने, दुष्काळाने व मरीने का मरता?

14जे कोणी संदेष्टे तुम्हाशी बोलतात आणि म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, कारण ते तुम्हाला खोटे भविष्य सांगतात.

15कारण परमेश्वर असे म्हणतो, “मी त्यांना बाहेर पाठवले नाही. ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात यासाठी की, मी तुम्हाला बाहेर काढून टाकावे आणि तुम्ही व जो कोणी संदेष्टा तुम्हाला भविष्य सांगतो त्या दोघांनी नष्ट व्हावे. ”

16मी याजकांना व सर्व लोकांना बोललो, आणि म्हणालो, “परमेश्वर असे म्हणतो, जे कोणी तुमचे संदेष्टे तुम्हास भविष्य सांगतात व म्हणतात, पाहा, परमेश्वराच्या मंदिरातील वस्तू बाबेलाहून आता परत लवकरच आणल्या जातील, ते तुम्हाला ते खोटे भविष्य सांगतात. म्हणून त्यांची वचने ऐकू नका.

17त्यांचे ऐकू नका. तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करा व जिवंत रहा. या नगराची नासाडी का व्हावी?

18जर ते खरेच संदेष्टे असतील आणि त्यांच्याकडे खरेच परमेश्वराकडून वचन मिळाले असेल, परमेश्वराच्या मंदिरात व यहूदाच्या राजाच्या घरात व यरुशलेमेमध्ये ज्या वस्तू उरल्या आहेत, ती बाबेलास जाऊ नयेत, म्हणून त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करावी.”

19सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जे खांब व जो ओतीव समुद्र व ज्या बैठकी व बाकीची पात्रे या नगरात उरली आहेत,

20म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या याला, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार यांना कैद करून बाबेलास नेले, तेव्हा त्या वस्तू नेल्या नव्हत्या.

21सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, परमेश्वराच्या मंदिरात आणि यहूदाच्या राज्याच्या घरात व यरुशलेमेमध्ये अजून राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल हे म्हणतो,

22“त्या बाबेलास नेण्यात येतील आणि मी त्यांची पाहणी करीन त्या दिवसापर्यंत त्या तेथेच राहतील.” “नंतर त्या मी परत आणून आणि त्या पुन्हा त्याच जागेवर ठेवीन.”असे परमेश्वर म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran