Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Revelation 17 >> 

1मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो.

2पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षारसाने मस्त झाले. ”

3तेव्हा त्याने मला आत्म्याने अरण्यात नेले आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्याला सात डोकी व दहा शिंगे होती.

4त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा व मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व तिच्या लैंगिक पापांच्या घाणीने भरलेला एक सोन्याचा प्याला होता.

5तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, ‘महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. ’

6आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी(साक्षीचे रक्त)हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती. आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.

7तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला ह्या स्त्रीचे, आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, (ज्याला सात डोकी आणि दहा शिगे आहेत) त्या पशूचे रहस्य सांगतो.

8आणि तू जो पशू बघितलास, जो होता, आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल. आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील. कारण तो होता, नाही, आणि येणार आहे.

9“इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे ते सात डोंगर आहेत.

10आणि सात राजे आहेत. पाच पडले आहेत, एक आहे, आणि दुसरा अजून आलेला नाही. आणि तो आल्यावर त्याला फारच थोडा वेळ रहावे लागेल.

11आणि तो जो पशू होता, आणि नाही, तो आठवा राजा आहे. तो सातांपासून झालेला आहे, आणि नाशात जात आहे.

12आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.

13“ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात.

14ते कोकर्‍याशी युध्द करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. ”

15आणि तो मला म्हणतो, “तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत.

16आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा व्देष करतील. तिला आेसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील, आणि तिला अग्नीत जाळतील.

17कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशूला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे.

18आणि तुला जी स्त्री दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे. ”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Revelation 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran