Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 3 >> 

1मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा एद्रई येथे बाशानचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.

2परमेश्वर मला म्हणाला, त्याला भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.

3आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्याला असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.

4मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच.

5या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती.

6हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, बायका, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.

7गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली.

8“अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.

9(सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)

10माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलका व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला.”

11रेफाई लोकांपैकी बाशानचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.)

12“तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.

13गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.

14मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांची सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्याला हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.)

15आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला.

16त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्याना गिलादापासुन आर्णोन आखोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली.

17तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अरबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.

18त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.

19तुमच्या बायका, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील.

20आणि तुमच्यासारखे तुमच्या भाऊबंदाना परमेश्वर विसावा देईल व त्यांना देऊ केलेला यार्देन नदी पलीकडचा प्रदेश बांधवांनी ताब्यात घेईपर्यंत त्यांना मदत करा. मग तुम्ही आपापल्या प्रदेशात परत या.”

21मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.

22तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”

23मग त्या समई मी परमेश्वराला विनंती करून, मी म्हणालो,

24“हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासाला आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे?

25तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”

26पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.

27पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.

28यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्याला उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांना पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल.”

29“आणि म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran