Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 22 >> 

1आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा.

2जर तो बंधू जवळपास राहत नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा.

3कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा.

4कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.

5बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे.

6वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.

7हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.

8नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.

9द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.

10बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.

11लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.

12वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.

13एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि

14मी या बाईशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.

15तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.

16मुलीच्या बापाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्याला नकोशी झाली आहे.

17त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी.

18यावर गावच्या वडिलांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.

19त्याला शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.

20पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर

21गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही मूर्खपणाची गोष्ट केली आहे. आपल्या वडिलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.

22एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.

23एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर

24त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.

25पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.

26त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.

27त्यालाही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.

28जिचा वाङ्निश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास

29त्याने मुलीच्या वडीलांना पन्नास शेकेल रुपे द्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.

30“आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran