Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Romans 8 >> 

1म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही.[ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.]

2कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.

3कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.

4म्हणजे, आपण जे देहाला अनुसरून नाही, पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत, त्या आपल्यात, नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी.

5कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात.

6कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.

7कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही, आणि, त्याला खरोखर, होता येत नाही.

8म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.

9पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहा. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.

10पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मेलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे.

11पण ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.

12म्हणून, बंधूंनो, आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही

13कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.

14कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवितो ते देवाचे पुत्र आहेत.

15कारण तुम्हाला, पुन्हा भय धरण्यास, दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे, ‘अब्बा, बापा, ’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे.

16तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण त्याचे वारीस आहोत.

17आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.

18कारण मी मानतो की, ह्या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.

19कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.

20कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली;

21कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल.

22कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे.

23आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहो.

24कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?

25पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.

26त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.

27आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.

28कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.

29कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.

30आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.

31मग ह्या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?

32आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्याला दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?

33देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.

34दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.

35ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?

36कारण असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’

37पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.

38कारण माझी खातरी आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी, किंवा बले,

39किंवा उंची किंवा खोली, किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Romans 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran