Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Romans 14 >> 

1जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.

2कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाज्या खातो.

3जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.

4दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे.

5आणि, कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.

6जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे, आणि जो खातो तोही प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही, आणि देवाचे उपकार मानतो.

7कारण, आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.

8कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो, आणि आपण मेलो तरी प्रभूकरता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे आहोत.

9कारण ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.

10मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.

11कारण असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करिल.’

12तर मग आपल्यातला प्रत्येक जण देवाला आपआपला हिशोब देईल.

13तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.

14मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुध्द नाही, पण, जो कोणी कोणतीही गोष्ट अशुध्द मानतो त्याला ती अशुध्द आहे.

15पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता, प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मेला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.

16म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.

17कारण, खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

18कारण, जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला संतोष देणारा व माणसांनी पारखलेला होतो.

19तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.

20अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर शुध्द आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्याला ते वाईट आहे.

21मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.

22तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.

23पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही. कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Romans 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran