Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Lamentations 3 >> 

1तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.

2त्याने मला नेले, आणि प्रकाशाकडे न चालवता, अंधारात चालवले.

3खरोखर तो आपला हात माझ्याविरुध्द सारा दिवस पुन्हा पुन्हा चालवतो.

4त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि त्याने माझी हाडे मोडली आहेत

5त्याने माझ्याविरूध्द बांधकाम केले आहे आणि विष व दुःख यांनी मला वेढले आहे.

6जे खूप आधी मरून गेले त्यांच्याप्रमाणे त्याने मला अंधकारात बसवले आहे.

7त्याने माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणून माझ्याकडून बाहेर निघवत नाही. त्याने माझ्या बेड्या जड केल्या आहेत.

8मी जेव्हा मदतीसाठी आक्रोश करतो व ओरडतो, तेव्हा सुध्दा तो माझी प्रार्थना ऐकत नाही.

9त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.

10तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे.

11त्याने माझ्या मार्गावरुन मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे.

12त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे.

13त्याने आपले बाण माझ्या अंतकरणात घुसवले आहे.

14मी माझ्या माणसांमध्ये चेष्टेचा विषय झालो. सर्व दिवसभर, ते मला उद्देशून गाणी गातात व माझी टर्र उडवितात.

15त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडूदवणा प्यायला भाग पाडले आहे.

16त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे.

17मला पुन्हा कधीही शांती मिळणार नाही, असे मला वाटले. मी चांगल्या गोष्टी तर विसरलो.

18मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.”

19माझे दु:ख, कष्ट, कडूदवणा आणि विष ह्याचे स्मरण कर.

20मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे.

21पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते.

22ही परमेश्वराची प्रेमदया आहे जे आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.

23ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.

24माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”

25जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्याला शोधतो त्याला, परमेश्वर चांगला आहे.

26परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे.

27पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्याला फार चांगले आहे.

28ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ राहावे.

29त्याने आपले तोंड धुळीत ठेवावे, कदाचित अशाने आशा राहील.

30जो मणुष्य मारत असेल त्याला खुशाल गालात मारू द्यावे व तो अपमान सहन करूण घ्यावा.

31कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही.

32जरी त्याने दु:ख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील.

33कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्यसंतानास दु:ख देत नाही.

34पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे,

35परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे,

36एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिला फसविणे, ह्या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय?

37परमेश्वरने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का?

38इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठाच्या मुखातून येत नाहीत काय ?

39कोणत्याही जीवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षे बद्दल कुरकुर का करावी ?

40चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.

41आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावू या.

42“आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हाला क्षमा केली नाहीस.

43तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हाला ठार केलेस.

44कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वत:ला अभ्रांनी वेढले आहेस.

45लोकांमध्ये तू आम्हाला कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.

46आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूध्द आपले तोंड वासले आहे.

47भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे.”

48माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.

49माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही;

50परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याला काही खळ पडणार नाही.

51माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दु:खी करतात.

52निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.

53गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे.

54माझ्या डोक्यावरुन पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.”

55परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला.

56तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको.

57मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”

58परमेश्वरा, तू माझ्या जीवाचे वाद चालवलेस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास.

59परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघीतला आहेस. तू मला न्याय दे.

60माझ्या शत्रूंनी मला कसे दुखविले आणि माझ्याविरुद्ध कसे कट रचले ते तू पाहिले आहेस.

61त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरुध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस.

62माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे.

63परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे.

64परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परतफेड कर.

65तू त्यांना ह्रदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील.

66क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Lamentations 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran