Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Nahum 1 >> 

1निनवेविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.

2परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो.

3परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरपराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.

4तो समुद्राला दटावतो आणि त्याला कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.

5त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यात राहणारा प्रत्येक माणूस थरथरतो.

6त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.

7परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.

8पण तो त्याच्या शत्रूंचा पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.

9तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही.

10ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत:च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.

11जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे.

12परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही.

13तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.

14आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.

15पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Nahum 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran