Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 74 >> 

1देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.

2तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?

3देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल. शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.

4शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या. ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.

5फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे शत्रुचे सैनिक दिसत होते.

6देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करून तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.

7त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले. तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून देण्यासाठी ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.

8शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले. त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थान जाळून टाकले.

9आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही. आता कोणी संदेष्टे राहिले नाही. कुणालाही काय करावे ते कळत नाही.

10देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?

11देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस? तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.

12देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.

13देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.

14समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.

15तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस.

16देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.

17पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.

18देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.

19त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस. तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.

20आपला करार आठव या देशातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.

21देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.

22देवा, ऊठ! आणि युध्द कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.

23तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 74 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran