Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 55 >> 

1देवा, माझी प्रार्थना ऐक कृपाकरून माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.

2देवा, कृपाकरून माझे ऐक आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.

3माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले, तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.

4माझे हृदय धडधडत आहे मी खूप घाबरलो आहे.

5मी भीतीने थरथर कापत आहे. मी भयभीत झालो आहे.

6मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.

7मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.

8मी पळूत जाईन मी माझी सुटका करेन. मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.

9प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.

10माझ्या भोवती संकटे आहेत. दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.

11रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत. लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.

12जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन.

13परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र, माझा साथी, माझा दोस्त.

14आपण आपली गुपित एकमेकांना सांगितली आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.

15माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे, जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते. का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.

16मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर माझे रक्षण करील.

17मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो. मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो.

18मी पुष्कळ लढाया लढलो आहे. पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले.

19देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.

20माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत. ते देवाला घाबरत नाहीत. आणि त्याला मान ही देत नाहीत.

21माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.

22माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात.

23तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही. [24] देवा, त्या खोटारड्या आणि खुनी माणसांना त्यांचे आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थडग्यात पाठव आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 55 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran