Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 51 >> 

1देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.

2देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.

3मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.

4तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.

5मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.

6देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.

7मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.

8मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.

9माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक.

10देवा माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.

11मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.

12मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.

13पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.

14देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.

15प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.

16तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही.

17देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या हृदयाकडे पाठ फिरवणार नाहीस.

18देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.यरुशलेमच्या भिंती बांध.

19नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील. आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 51 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran