Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Mark 1 >> 

1देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.

2यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.

3अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ''परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.”

4त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.

5यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्यांच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.

6योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा असून, तो टोळ व रानमध खात असे.

7तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे, आणि मी त्याच्या वहाणांचा बंद लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.

8मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”

9त्यादिवसात असे झाले की, येशू गालीलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत येशूचा बाप्तिस्मा घेतला.

10येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आहे आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्याला दिसले.

11तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

12मग आत्म्याने लगेचच त्याला अरण्यांत घालवले.

13सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.

14योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालीलास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.

15आणि तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.

16येशू गालीलाच्या समुद्राजवळून जात असता तेव्हा त्याला शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.

17येशू त्यांना म्हणाला, ''माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.''

18मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

19तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले.

20त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग त्यांनी त्यांचा बाप जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.

21नंतर ते कफर्णहूमास गेले, लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.

22त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.

23त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुध्द आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,

24आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र तो तूच.

25परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”

26''नंतर अशुध्द आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.''

27आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुध्द आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!

28येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.

29येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.

30शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.

31तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले, आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.

32संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.

33सर्व शहर दारापुढे जमा झाले.

34त्याने निरनिराळ्या रोगानी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.

35मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.

36शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,

37व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “ आम्ही सर्व जण तुमचा शोध करीत आहेत.”

38तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”

39मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

40एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, '' आपली इच्छा असली तर मला शुध्द करण्यास आपण समर्थ आहात.''

41येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुध्द हो.”

42आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुध्द झाला.

43येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.

44आणि म्हटले “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुध्दीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.

45परंतु तो तेथून गेला व घोषणा करून करून ही बातमी इतकी पसरवली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आलेच.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Mark 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran