Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Matthew 6 >> 

1“लोकांनी आपली न्यायीपण पहावे म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर जपा तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.

2म्हणून जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हाला खचीत सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.

3म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुप्तपणे द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका.

4दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचा मोबदला देईल.

5“जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकास दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.

6पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हाला प्रतिफळ देईल.

7“आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी निरर्थक बडबड करू नका. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.

8त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला माहित असते.

9म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी. ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.

10तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

11आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.

12जसे आमच्याविरूध्द केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,

13आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला त्या दुष्टापासून सोडव.’ [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.]

14कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हाला क्षमा करील;

15पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही

16“जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.

17तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धू.

18यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.

19“येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील.

20म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.

21जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

22“डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल.

23पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.

24“कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हाला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

25“म्हणून मी तुम्हाला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

26आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हाला माहीत आहे.

27आणि चिंता करून आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?

28“आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कपडे विणीत नाहीत,

29तरी मी तुम्हाला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखाहि सजला नव्हता.

30तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, रानफुल आज आहेत तर उद्या भट्टीत पडतात जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हाला घालणार नाही काय?

31“आम्ही काय खावे, प्यावे, पांघरावे? असे म्हणून त्यांची चिंता करू नका.

32कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे.

33तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर यावरील सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील.

34म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Matthew 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran