Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Acts 6 >> 

1त्यादिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहूद्यांची इब्री लोकांविरूध्द कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.

2तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, "आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.

3तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू.;

4म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू."

5ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली;

6त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.

7मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.

8स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अदभूते व चिन्हे करत असे.

9तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.

10पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना

11तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, आम्ही स्तेफनाला मोशेविरूध्द व देवाविरूध्द दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले;

12आणि लोकास, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले. त्यांनी स्तेफनावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले.;

13आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, "हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूध्द दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.

14कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हाला लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील."

15तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Acts 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran