Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Acts 14 >> 

1पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा अशारीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.

2परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहूदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.

3म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला. आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहीले. पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अदभूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले.

4परंतु शहरातील काही लोकांना यहूदी लोकांची मते पटली. दुसऱ्या लोकांना प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले. त्यामुळे शहरात दोन तट पडले.

5काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.

6पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.

7त्या ठिकाणीसुध्दा त्यांनी सुवार्ता सांगितली.

8लुस्त्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता.

9पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टि लावून व त्याला आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून,

10मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.

11पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”

12लोकांनी बर्णबाला ज्युपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.

13ज्युपितरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांना पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.

14परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले,

15लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हाला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.

16भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले.

17परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिध्द व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हाला आकाशातून पाऊस देतो.योग्यवेळी तो तुम्हाला चांगले पीक देतो. तो तुम्हाला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो”

18पौल व बर्णबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या, व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.

19नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.

20येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले.

21आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.

22आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”

23पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.

24पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले.

25त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.

26नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.

27ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने विश्वासाचे दार कसे उघडले ते सांगितले,

28नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Acts 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran