Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 40 >> 

1मग परमेश्वर मोशेला म्हणाला,

2पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सभामंडपाचा निवासमंडप उभा कर.

3साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.

4मग मेज मध्ये आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.

5साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.

6दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.

7दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यात पाणी भर.

8सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.

9अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.

10होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.

11गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.

12“अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.

13अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्याला तेलाने अभिषेक करून पवित्र कर मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.

14त्याच्या पुत्रांजवळ बोलावून अंगरखे घाल.

15त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”

16मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.

17दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.

18परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;

19त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.

20मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.

21त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

22मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूस सभामंडपात पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;

23त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

24त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.

25नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

26त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.

27नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.

28त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.

29त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

30त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरले.

31मोशे, अहरोन व अहरोनाची पुत्र त्यात आपआपले हातपाय धूत असत;

32ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.

33त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्याप्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.

34दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.

35दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.

36पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्त्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरु करीत;

37परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.

38परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्त्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 40 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran