Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 38 >> 

1बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली.

2त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली.

3त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.

4त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.

5त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;

6त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले.

7वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यात त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूस फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.

8दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.

9त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती.

10तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.

11अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.

12अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याहि होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;

13पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती;

14अंगणाच्या फाटकाच्या एकाबाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्या करता तीन खांब व तीन उथळ्या होत्या;

15आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूस व त्या बाजूस पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याहि तीन तीन होत्या.

16अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.

17खांबाच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.

18अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पांच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पांच हात असावी.

19तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर अाधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती.

20निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.

21निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा पुत्र इथामार ह्याने केली ती ही.

22ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हुराचा नातू म्हणजे उरीचा पुत्र बसालेल याने बनविल्या;

23तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाकाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, व जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता.

24पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते. आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.

25मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.

26वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येकी एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.

27त्यांनी ती चांदी पवित्रस्थानातील शंभर उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या.

28बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.

29सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.

30त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्या करता;

31त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 38 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran