Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 35 >> 

1मोशेने सगळया इस्त्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्याः

2सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्यादिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.

3शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या रहात असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.

4मोशे सर्व इस्त्राएल लोकाच्या मंडळीस म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हेः

5परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ;

6निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;

7लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;

8दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;

9तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.

10“तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे

11निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;

12कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,

13मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;

14प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल;

15धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;

16होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;

17अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;

18निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी देणाऱ्या मेखा व तणावे,

19पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”

20मग इस्त्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.

21नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.

22ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगडया असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.

23ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.

24चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले.

25ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.

26आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ति होऊन त्यांना बुध्दि झाली, त्या सर्वानी बकऱ्याचे केस कातले.

27अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.

28दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला.

29परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वासाठी इस्त्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली ज्या ज्या स्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली त्यांनीही अर्पणे आणली.

30तेव्हा मोशे इस्त्राएल लोकांना म्हणाला, पहा, परमेश्वराने यहूदा वंशातील उरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे.

31आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दि, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.

32तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील.

33तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागीरीची कामें करील.

34परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्याच्याठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे.

35कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 35 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran