Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 30 >> 

1तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.

2ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.

3वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.

4त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.

5हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.

6वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.

7अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;

8पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा.

9तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याहि प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.

10अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.

11मग परमेश्वर मोशेला म्हणाला,

12तू इस्त्राएल लोकांची शिरगणती करिशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्त्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा;

13जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.

14वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे.

15तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;

16इस्त्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्त्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.

17परमेश्वर मोशेला म्हणाला,

18“पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.

19या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत;

20दर्शनमंडपात व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.

21अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”

22मग परमेश्वर मोशेला म्हणाला,

23तूं उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,

24आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घेऊन,

25व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;

26या तेलाने दर्शनमंडप व साक्षीकोश,

27तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,

28तसेच होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यासर्वाना अभिषेक करावा.

29त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.

30आणि “अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;

31इस्त्राएल लोकांना तू सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हाला माझ्यासाठीच हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.

32हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व ह्या प्रकारचे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे.

33जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परकीयाला लावील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”

34नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, तूं हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;

35आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेला, निर्भेळ शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे;

36त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शनमंडपातील ज्या साक्षकोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन तेथे ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.

37हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे; त्यासारखे दुसरे धूपद्रव्य तुम्ही स्वतःसाठी तयार करु नये.

38सुवास घेण्याकरता कोणी असले काही तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 30 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran