Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 27 >> 

1परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.

2वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी.

3वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.

4तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.

5ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.

6वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.

7ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.

8वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंस फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.

9निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एकाबाजूला शंभर हात असावी.

10तिच्याकरिता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.

11वेदीच्या उत्तर बाजूसही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.

12अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.

13अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.

14अंगणाच्या फाटकाच्या एकाबाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;

15फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही पंधरा हात लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.

16अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.

17अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.

18अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावे; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.

19पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.

20इस्त्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतूनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;

21अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपात अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्त्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran