Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 2 >> 

1लेवी वंशातील एका माणसाने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला.

2ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले.

3पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून आणि ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.

4त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.

5त्यासमयी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले.

6तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बालक दिसले. पाहा ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलापैकी आहे.”

7मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, “या बाळास दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?”

8फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.

9फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, “ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन.” तेव्हा ती बाई बाळास घेऊन त्याला दूध पाजू लागली.

10ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्याला फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.

11काही दिवसांनी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्यांने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री माणसास मारत असताना त्याने पाहिले.

12तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या माणसाला जिवे मारले व वाळूत पुरुन टाकले.

13दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला तेव्हा पाहा दोन इब्री माणसे मारामारी करत होती. त्यांच्यामधील एक दोषी होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?”

14पण त्या माणसाने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यांस जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहतोस का ? ” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचित सर्वाना माहीत झाले आहे.”

15आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.

16मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या कळपास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या;

17परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपास पाणी पाजले.

18मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आल्या आहात?”

19त्या म्हणाल्या, “एका मिसरी माणसाने आम्हाला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजले.”

20तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या माणसाला का सोडले ? त्याला बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.”

21त्या माणसापाशी राहण्यास मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला.

22तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले. कारण मी परदेशात वस्ती करून आहे.

23बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्त्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यत वर जाऊन पोहचला;

24देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण केली.

25देवाने इस्त्राएली लोकांना पाहिले आणि त्याला त्यांची परिस्थिती समजली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran