Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 17 >> 

1सर्व इस्त्राएल लोकांच्या समुदायाने सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.

2तेव्हा इस्त्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, आम्हाला प्यावयास पाणी दे. मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही मजशी कां भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा कां पाहात आहात?

3परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”

4तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”

5परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्त्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.

6पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील” मोशेने हे सर्व इस्त्राएलांच्या वडिलासमोर केले.

7मोशेने त्या ठिकाणाचे नांव मस्सा (परीक्षा) व मरीबा (कलह) ठेवले; कारण याठिकाणी इस्त्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.

8रफीदिम येथे अमालेकी लोक इस्त्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.

9तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”

10यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.

11जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्त्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई.

12काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.

13तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकांचा पराभव केला.

14नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या ह्या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांना पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”

15मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला याव्हे-निस्सी “परमेश्वर माझे निशाण” असे नांव दिले.

16आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran