Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 15 >> 

1नंतर मोशे व इस्त्राएल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गाईले, ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.

2परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे. तो माझे तारण झाला आहे. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.

3परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नांव याव्हे आहे.

4त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.

5खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.

6हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.

7तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस; अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.

8तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकाराने जलाच्या राशि बनल्या. जलप्रवाह राशी सारखे उंच उभे राहिले, जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले.

9शत्रु म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.

10परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायु सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले.

11“हे परमेश्वरासारखा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे? पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक, अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?

12तू तुझा उजवा हात उगारला पृथ्वीने त्यांना गिळून टाकले.

13तू उध्दारलेल्या लोकांना तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस; तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र आणि आनंददायी प्रदेशात नेले आहे.

14इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील; पलेशेथात राहणारे लोक भीतीने थरथरा कांपतील.

15मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले. मवाबाचे नायक भीतीने थरथरा कांपत आहेत आणि कनानी लोक गलित झाले आहेत.

16तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांना काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;

17तू तुझ्या लोकांना तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील; हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे. हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच.

18परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”

19फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले याप्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्त्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.

20त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

21मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले. परमेश्वराला गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत. त्याने घोडा व स्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.

22मोशे इस्त्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.

23तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले.

24लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”

25मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक वनस्पति दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्यावेळी परमेश्वराने इस्त्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.

26तू आपला देव परमेश्वर याचें वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधि मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधि मुक्त करणारा परमेश्वर आहे.

27मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran