Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Genesis 25 >> 

1अब्राहामाने दुसरी बायको केली; तिचे नाव कटूरा होते.

2तिच्यापासून त्याला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.

3यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.

4एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.

5अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले.

6अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले.

7अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला.

8अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांना जाऊन मिळाला.

9इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.

10हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची बायको सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.

11अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता.

12अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही :

13इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे : इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायाथ, केदार, अदबील, मिबसाम,

14मिश्मा, दूमा, मस्सा,

15हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा.

16ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले.

17ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.

18त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते.

19अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना ह्या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला.

20इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला बायको करून घेतले.

21इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची बायको गरोदर राहिली.

22मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वराला याबद्दल विचारायला गेली.

23परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”

24जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती.

25आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.

26त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या बायकोने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.

27ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे.

28एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.

29याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता.

30एसाव याकोबाला म्हणला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खावयला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले.

31याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.”

32एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. ह्या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?”

33याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.

34याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Genesis 25 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran