Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Genesis 22 >> 

1या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.”

2नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोसत्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”

3तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासाला निघाले.

4तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली.

5मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.”

6अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे संगती निघाले.

7इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?”

8अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले.

9देवाने सांगिलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले.

10मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला.

11परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्याला म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

12तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.”

13आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्याला होमार्पण म्हणून अर्पण केले.

14तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.

15नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली

16आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,

17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील.

18पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळलास.”

19मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला.

20या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत.”

21त्याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामाचा बाप कमुवेल,

22त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत.

23बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;

24त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार मुलगे झाले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Genesis 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran