Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 9 >> 

1आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले.

2तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वराला अर्पण कर;

3आणि इस्राएल लोकांना असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत;

4आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बळी म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे.”

5मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजन येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.

6तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हाला दिसेल.”

7मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकाकडील बळीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”

8तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला.

9मग अहरोनाचे मुलगे रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.

10त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.

11मग अहरोनाने मांस कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.

12नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.

13नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.

14त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.

15मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला.

16त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला.

17मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.

18लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.

19अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.

20त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला.

21अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.

22मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.

23मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांना दिसले;

24तेव्हा परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran