Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 13 >> 

1परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,

2एखाद्या माणसाच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ठ्यासारखा दिसत असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.

3मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.

4त्या माणसाच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या माणसाला सात दिवस इतर माणसापासून वेगळे एकटे ठेवावे.

5सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.

6सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.

7परंतु त्या माणसाने स्वत:ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.

8याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.

9एखाद्या माणसाला महारोगाचा चट्टा असेल तर त्याला याजकाकडे न्यावे.

10याजकाने त्याला तपासावे; आणि जर त्याच्या कातडीला पांढच्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर

11त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.

12एखाद्या माणसाच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्याला अंगभर तपासावे,

13याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्याला दिसून आले तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.

14पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.

15याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.

16परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;

17याजकाने पुन्हा त्याला तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.

18कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला

19व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.

20याजकाने त्याला तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे.

21पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.

22तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे.

23पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या माणसाला शुद्ध ठरवावे.

24एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.

25तर याजकाने त्याला तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.

26परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.

27सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;

28परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.

29एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्टा असला,

30तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ती चाई डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.

31तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याजकाने सात दिवस वेगळे ठेवावे;

32सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,

33तर त्या माणसाने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या माणसाला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.

34सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या माणसाने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.

35परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली

36तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या माणसाला अशुद्ध ठरवावे.

37परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.

38कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील.

39तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय न करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.

40कोणा माणसाचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो माणूस शुद्ध होय.

41त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो माणूस शुद्ध आहे.

42परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.

43मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,

44तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.

45ज्या माणसाला महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांना इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे.

46जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.

47“एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला,

48किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला.

49आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय; तो याजकाला दाखवावा;

50याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी.

51त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे.

52ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, तसेत चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे;

53परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.

54याजकाने लोकांना ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.

55त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.

56परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.

57इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.

58परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाहीतर मग ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”

59लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran