Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hebrews 3 >> 

1म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा प्रमुख याजक आहे.

2देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्याला प्रेषित व प्रमुख याजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता.

3ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.

4कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे.

5देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली.

6परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे

7म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,

8तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राइल लोकांंनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,

9जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.

10त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, ‘या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांना माझे मार्ग कधीही जाणले नाहीत’

11म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’”

12बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये म्हणून जपा.

13जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.

14कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.

15पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

16ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने मिसर देशातून बाहेर नेले होते?

17आणि तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.

18कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?

19हयावरुन आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hebrews 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran