Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hebrews 13 >> 

1बंधुवरील प्रीती निरंतर राहो.

2अतिथींचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.

3तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.

4सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व अंथरूण निर्दोष असावे. कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.

5आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे. “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”

6म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”

7ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा. व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.

8येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.

9विवीध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. काऱण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.

10ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे.

11यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.

12म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले,

13म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.

14कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.

15म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या आेठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण' त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.

16आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.

17आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.

18आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेकबुद्धी शुध्द आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत राहावे अशी आमची इच्छा आहे.

19मी तुम्हाला विनंति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.

20ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.

21त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.

22बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हाला करतो.

23आपला बंधू तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.

24तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील सर्व जण तुम्हाला सलाम सांगतात.

25देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hebrews 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran