Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 4 >> 

1एहूद मरण पावल्यावर इस्त्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले.

2तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; सीसरा नावाचा त्याचा सैन्याचा सेनापति होता आणि तो विदेश्यांचे नगर हरोशेथ येथे राहत होता.

3त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्त्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्त्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीसाठी धावा केला.

4त्या समयी लप्पिदोथाची बायको दबोरा भविष्यवादीण ही इस्त्राएलाचा न्यायनिवाडा करित असे.

5एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्त्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडविण्यास येत असत.

6तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला नफतालीच्या केदेशातून येथून बोलावणे पाठवून म्हटले, तू नफताली व जबुलून ह्यांच्यांतले दहा हजार पुरूष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्त्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.

7तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.

8बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.

9ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन पण ज्या मार्गाने तू जाणार आहे त्यात तुझा सन्मान होणार नाही कारण देव सीसारा ह्याला एका बाईच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.

10बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरूष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.

11मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता.

12इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,

13तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशें लोखंडी रथ आणि आपल्याजवळचे सर्व सैन्य, विदेश्यांचे हरोशेथापासून कीशोन नदीपर्यत बोलावून एकवट केले.

14दबोरा बाराकाला म्हणाली, ऊठ, आजच देवाने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.

15देवाने सीसरा व त्याचे सर्व रथ आणि त्याचे सैन्य ह्यांना गोंधळून टाकले; आणि बाराकाच्या माणसांनी त्यावर हल्ला केला आणि तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.

16पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथ पर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तरवारीच्या धारेने पडली; आणि त्यातला एकही वाचला नाही.

17सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.

18तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.

19तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यावयाला दे मला तहान लागली आहे. तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्याला दूध प्यावयाला दिले व तिने त्याला पुन्हा झाकले.

20तो तिला म्हणाला, डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरूष आहे काय? तर नाही म्हणून सांग.

21मग हेबेराची बायको याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.

22बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हांला दाखवते. तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.

23अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्त्राएल लोकांपुढे पराजित केले.

24इस्त्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran