Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 18 >> 

1त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसांत दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायाला पाहत होता; कारण त्या दिवसापर्यंत त्यांस इस्राएलाच्या वंशांमध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता.

2दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून, सरा व अष्टावोल यांतून अनुभवी असे पांच शूरयोध्दे पुरुष निवडून देश पायी टेहाळणी व पाहणी करण्यास पाठवले; तेव्हां त्यानी त्यांस सांगितले, जा आणि तो देश पाहा. मग ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली.

3ते मिखाच्या घराजवळ होते, तेव्हां त्यानी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला; यास्तव ते तिकडे वळून त्याला बोलले, तुला इकडे कोणी आणले? आणि तू ह्याजागी काय करतोस? तू येथे का आहेस?

4तो त्यास म्हणाला, मिखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे, आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे.

5तेव्हा त्यानी त्याला सांगितले, तू कृपाकरून देवाला सल्ला विचार, आणि आम्ही जो प्रवास करत आहोत तो सफल होईल किंवा नाही.

6तेव्हा तो याजक त्यांस बोलला, तुम्ही शांतीने जा; ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे परमेश्वर देव तुमचे मार्गदर्शन करील.

7मग ती पाच माणसे निघून आणि लईश येथे आली, आणि त्यानी पाहिले की त्यात राहणारे लोक तेथे सुरक्षित आहेत, ज्याप्रकारे सिदोनी अबाधित व सुरक्षित राहत आहेत; आणि देशांत कशा प्रकारेही त्रास देणारा किंवा त्यांना जिंकणारा एकही जण तेथे नव्हता; ते सिदोन्यांपासून फार दूर रहात होते, आणि त्यांचे कोणाबरोबरही व्यवहारीक संबंध नव्हते.

8नंतर ते सरा व अष्टावोल तेथे आपल्या वंशाजवळ आले; तेव्हा त्यांच्या नातेवाइकांनी त्यांस विचारले, आपला अहवाल काय आहे?

9ते म्हणाले, चला! आपण त्याच्यावर हल्ला करू! कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करत नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून जाण्यासाठी कंटाळा करू नका.

10जेव्हा तुम्ही जाल, तुम्ही अशा लोकांकडे याल जे असा विचार करतात आम्ही सुरक्षित आहोत आणि विस्तीर्ण देश आहे; देवाने ते तुम्हाला दिले आहे, ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही.

11मग तेथून, म्हणजे सरा व अष्टावोल यांतून दानाच्या कुळांतले सहाशें पुरुष लढाईसाठी शस्त्रे घेऊन निघाले.

12तेव्हा त्यानी जाऊन यहुदातल्या किर्याथ यारीम जवळ तळ दिला; यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला महाने दान असे म्हणतात; ते किर्याथ यारीमाच्या पश्चीमेस आहे.

13मग ते तेथून पुढे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मिखाच्या घरापर्यंत आले.

14तेव्हां जी पाच माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती, त्यानी आपल्या नातेवाइकास असे म्हणाले, या घरामध्ये याजकाचे एफोद व घरगुतीदेव, आणि कोरीव मूर्ति व ओतीव धातूची मूर्त्ति आहे; हे तुम्हास कळले की काय? तर आतां ठरवा तुम्ही काय कराच ते.

15मग त्यांनी तिकडे वळून मीखाच्या घरी त्या तरुण लेव्याच्या घरात जाऊन त्याला अभिवादन केले.

16नंतर जी दानाच्या लोकांतली सहाशे माणसे ती आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशव्दाराशी उभी राहिली.

17आणि जी पांच माणसे देश हेरायला गेली होती, त्यांनी आत शिरून, आणि त्यानी ती कोरीव मूर्त्ति घेतली; तेव्हा तो याजक लढाईची शस्त्रे घेतलेली जी सहाशे माणसे होती त्याच्या बरोबर दरवाज्यापुढे उभा होता.

18तर त्यानी मिखाच्या घरांत जाऊन ती कोरींव मूर्त्ति व ते एफोद व ते घरगुतीदेव व ती ओतीव धातूची मूर्त्ति घेतली असता, तो याजक त्यांस म्हणाला, तुम्ही हे काय करीत आहात?

19त्यांनी त्याला सांगितले, तू शांत राहा! आपला हात आपल्या तोंडावर ठेव आमच्या बरोबर चल, आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे किंवा वंशाचा याजक होणे बरे आणि इस्राएलाच्या कुळाचा याजक व्हावे, कोणते बरे?

20तेव्हां त्या याजकाच्या मनास आनंद झाला; यास्तव त्याने ते एफोद व ते घरगुतीदेव व ती कोरींव मूर्त्ति घेऊन त्या लोका बरोबर गेला.

21अशा रीतीने ते वळून आणि दूर गेले. त्यानी लहान मुलेबाळे, गुरेढोरे व त्यांची मालमत्ता आपल्यापुढे घेऊन चालले.

22ते मिखाच्या घरापासून बरेच अंतर दूर गेल्यावर, ज्यांची घरे मिखाच्या घराजवळ होती, त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि दान लोकांच्या पाठीस लागली.

23त्यानी दानाच्या लोकांस हाक मारली; तेव्हां ते वळून आणि मिखाला म्हणाले, तुला काय झाले म्हणून तू समुदाय घेऊन आलास

24तो म्हणाला, मी केलेले देव तुम्ही चोरले आणि याजक तुम्ही घेऊन चालला, आणि आता मला दुसरे काहीच राहिले आहे काय? तर तुला काय झाले हे तुम्ही मला असे कसे विचारू शकता?

25मग दानाच्या लोकानी त्याला म्हटले, तू आपला आवाज आम्हास ऐकू देऊ नको; नाही तर आमच्यातली फार रागीट माणसे तुझ्यावर हल्ला करतील, आणि तू व तुझ्या घराण्याला मारून टाकतील.

26मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले, आणि मीखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, यास्तव तो माघारी फिरून आपल्या घरी गेला.

27मीखाने जी मूर्त्ती केल्या होत्या त्यांस आणि त्याचा जो याजक होता, त्याला त्यांनी घेतले; मग लईशावर, म्हणजे अबाध व सुरक्षित लोकांवर जाऊन त्यांस तरवारीने मारले, आणि नगरला आग लावून जाळले.

28तेव्हां त्यांना कोणी सोडवणारा नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर होते, आणि त्यांचा कोणाशीहि व्यवहार नव्हता; ते नगर बेथरहोबच्या खोऱ्याजवळ होते. दानी लोकांनी पुन्हा नगर बांधले आणि त्यांत राहिले.

29त्यांनी आपला पूर्वज दान, जो इस्राएलाचा एक पुत्र होता त्याचे नाव दान त्या नगरला दिले, परंतु पहिल्याने त्या नगराचे नाव लईश होते.

30नंतर दानाच्या लोकानी आपल्यासाठी ती कोरीव मूर्त्ति केली; आणि मोशेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले, देश बंदीवासात जाऊपर्यत दानाच्या वंशाचे याजक होती.

31देवाचे मंदिर शिलोमध्ये होते, तोपर्यत त्यानी आपल्यासाठी मिखाची कोरींव मूर्त्ति जी त्याने केली त्याची उपासना.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran