Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 10 >> 

1अबीमेलेखा नंतर इस्त्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला माणूस तो उभा झाला, आणि तो एफ्राईम डोंगराळ प्रदेशात शामीरात राहत होता.

2त्याने तेवीस वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीरात पुरला गेला.

3नंतर त्याच्यामागे गिलादी याईर उभा झाला, आणि त्याने बावीस वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला.

4त्याला तीस पुत्र होते; तीस गाढवावर ते बसत होते; आणि त्यांस तीस नगरेहि होती; आजपर्यंत त्यांस हावोथयाईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.

5मग याईर मेला, आणि त्याला कामोनात येथे पुरले.

6यानंतर इस्त्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यानी बाल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबांतले देव व आम्मोनी लोकांचे देव व पलिष्टयांचे देव, याची उपासना केली; त्यांनी परमेश्वराला सोडले, आणि यापुढे त्याची उपासना केलीच नाही.

7यास्तव देवाचा राग इस्त्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांस पलिष्टयांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.

8त्या वर्षी, त्या वर्षापासून अठरा वर्षे त्यानी इस्त्राएलाच्या लोकांस चिरडून आणि जाचजुलमाने यार्देनेच्या पलिकडे अमो-यांच्या देशातल्या गिलादात जे इस्त्राएली होते त्या सर्वाना जाचले.

9यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीहि लढायास अम्मोनी लोक यार्देनेच्या अलीकडे आले. मग इस्त्राएलावर फार मोठे दु:ख आले.

10तेव्हा इस्त्राएली लोकांनी देवाला मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, आम्ही तुझ्याविरूध्द पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बालाची उपासना केली.

11तेव्हा देवाने इस्त्राएलाच्या लोकांस म्हटले. मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोनाच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हास सोडवले नाही काय?

12आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हास जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हास त्यांच्या हातांतून सोडवले.

13तरी तुम्ही मला सोडून दुस-या देवांची उपासना केली; यास्तव मी येथूनपुढे तुमचा बचाव करणार नाही.

14जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यांला हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हास सोडवावे.

15तेव्हां इस्त्राएलाच्या लोकांनी देवाला म्हटले, आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हास कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ या दिवशी तू आम्हास सोडव.

16तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्त्राएलाच्या दु:खामुळे त्याच्या मनाला खेद झाला.

17अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यानी गिलादांत तळ दिला, आणि इस्त्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला.

18तेव्हां गिलादातले लोक व अधिकारी एकमेकाला म्हणाले जो माणूस अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादांतल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran