Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Galatians 5 >> 

1ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यात तुम्ही टिकून राहा, आणि दासत्वाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.

2पाहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की, तुम्ही जर सुंता करून घेतलीत तर तुम्हाला ख्रिस्ताचा उपयोग नाही.

3कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्याला मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे.

4नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेला अंतरला आहा,

5कारण आपण आत्म्याच्याद्वारे, विश्वासाने, नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहो.

6ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही; आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.

7तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?

8तुम्हाला जो बोलवत आहे त्याच्याकडची ही शिकवण नाही.

9‘थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवते’.

10मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही. पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना तो दंड भोगील.

11आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे.

12तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल.

13कारण बंधूंनो, तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.

14कारण, ‘जशी आपणावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती करा’.हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे.

15पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा संहार करू नये म्हणून जपा.

16म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही.

17कारण देहवासना आत्म्याविरुध्द आहे आणि आत्मा देहवासनेविरुध्द आहे; हे परस्परांस विरूध्द आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये.

18तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहा तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.

19आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः जारकर्म, अमंगळपणा, कामातुरपणा,

20मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट,

21मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, ह्या गोष्टी करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

22आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,

23सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूध्द नियमशास्त्र नाही.

24जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.

25आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.

26आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चिरडीस आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Galatians 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran