Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 6 >> 

1माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले,

2तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस.

3ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपल्याला वाचव, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.

4तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.

5शिकाऱ्याच्या हातातून हरिणाला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.

6अरे आळशी माणसा, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून आणि शहाणा हो.

7तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही.

8तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.

9अरे आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील?

10“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”

11आणि तुझे दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.

12दुर्जन मनुष्य वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,

13त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.

14त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो.

15यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्याला गाठेल; कोणत्याहि उपचारा पलिकडे एका क्षणात तो तुटेल.

16परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहेः

17गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,

18मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,

19लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा.

20माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.

21ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.

22जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.

23कारण आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.

24ते तुला अनीतिमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.

25तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.

26वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.

27मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून घेतला त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?

28जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?

29जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.

30जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्याला तुच्छ मानत नाही तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.

31पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल.

32जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.

33जखमा व अप्रतिष्ठा त्याला प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.

34कारण ईर्ष्या माणसाला संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.

35तो काही खंडणी स्विकारणार नाही, आणि त्याला बहुत दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran