Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 1 >> 

1इस्त्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नीतिसूत्रे.

2ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे,

3सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,

4भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे,

5ज्ञानाने ऐकावे आणि त्यांनी ज्ञानात वाढावे व बुद्धीमानाला मार्गदर्शन मिळावे,

6ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.

7परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.

8माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;

9ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यातले लोंबणारे पदक आहे.

10माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे;

11जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप्यावर हल्ला करू.

12जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवतंपणीच गिळून टाकू.

13आपणांस सर्व प्रकारच्या मोलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरू त्याने आपण आपली घरे भरू.

14तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.”

15माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस;

16त्यांचे पाय दुष्कृत्य करायला धावतात आणि ते रक्त पाडायला घाई करतात.

17एखादा पक्षी पाहत असतांना, त्याला फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे.

18ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात.

19जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्याप्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी ते धरून ठेवले आहे त्यांचाही जीव घेते.

20ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ती उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते;

21ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरुन घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी ती घोषणा करते,

22“अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हाला समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार?

23तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; मी आपले विचार तुम्हावर ओतील; मी आपली वचने तुम्हाला कळवील.

24मी बोलावले आणि पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही.

25परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषरोपाकडे दुर्लक्ष केले.

26म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन.

27जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील.

28ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही.

29कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही,

30त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली.

31म्हणून ते आपल्या मार्गातील फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील.

32कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील.

33परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran