Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Amos 9 >> 

1मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. जर कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही, आणि त्यांच्यातला एकालाही सुटता येणार नाही.

2ते खणून मृतलोकांत जरी गेले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच चढून गेले, तरी मी त्यांना तेथून खाली आणीन.

3ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल.

4ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले, तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे, तर त्यांना त्रास कसा होईल ह्या करीता लावीन.”

5आणि ज्याने भूमिला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, आणि त्यात राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.

6ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापीला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव यहोवा परमेश्वर आहे.

7परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलाच्या लोकहो, तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय? मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?”

8पाहा, प्रभू परमेश्वराचा डोळा पापी राज्यावर आहे, आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.

9“पाहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळेल, व त्यातील लहान अशी कणी देखील भुमीवर पडणार नाही.”

10माझ्या लोकांतील पापी जे असे म्हणतात, “आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हाला आडवेही येणार नाही. त्या सर्व तलवारीने मारतील.”

11त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे, मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे, ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन.

12“ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना, आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे, त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.” परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो.

13परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील.

14मी माझ्या लोकांना, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यांत वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.

15मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Amos 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran