Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Thessalonians 3 >> 

1बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगति व्हावी व त्याचे गौरव व्हावे;

2आणि हेकेखोर व दुष्टमाणसांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वाच्या ठायी विश्वास आहे असे नाही.

3परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील, व त्या दुष्टापासून राखील.

4तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेहि करीत जाल.

5प्रभुही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.

6बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या सप्रंदाया प्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.

7आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे;कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलों नाही;

8आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.

9तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.

10कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की,कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.

11तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही एेकतो.

12अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेेच अन्न खावे.

13तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका.

14ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;

15तरी त्याला शत्रू समजू नका, तर त्याला बंधू समजून त्याची कानउघडणी करा.

16शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.

17मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशारीतीने लिहीत असतो.

18आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Thessalonians 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran