Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 10 >> 

1रहबाम शखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.

2यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा मुलगा. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.

3तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामलाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामकडे आले. त्याला ते म्हणाले, “रहबाम,

4तुमच्या वडलांनी आमचे ज्यू फार भारी केले होते तर आता आपल्या बापाने लादलेले जड ज्यू ते आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”

5यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.

6राजा रहबामने मग आपल्या वडलांच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांशी काय बोलावे? मला या बाबतीत तुमचा सल्ला हवा आहे.”

7तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”

8पण रहाबामने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्या बरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला.

9रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांना काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या वडलांनी त्यांच्या मानेवर ठेवलेले ज्यू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”

10तेव्हा त्याच्या पिढीची ती तरुण मुले रहबामला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हाला म्हणाले की, मानेवर ज्यू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडलांनी आम्हाला कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हाला वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या वडीलांच्या कमरेपेक्षा जाड असेल.

11माझ्या वडीलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या वडलांनी तुम्हाला चाबकांचे फटकारे मारले. मी त्या चाबकांना धातूची अणकुचीदार टोके लावून शासन करीन.”

12“यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले.” राजा रहबामने त्यांना तसेच सांगितले होते.

13रहबाम त्यांच्याशी यावेळी अविचारीपणाने बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.

14तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांना म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हाला चाबकाने शासन केले असेल पण मी टोकदार धातूची टोके जोडलेल्या चांबकांनी शासन करीन.”

15राजा रहबामने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा मुलगा होता.

16राजा रहबामने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायच्या जमिनीत आमचा वाटा आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या मुलाला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले.

17पण यहूदाच्या नगरांमध्ये राहाणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.

18हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामने त्याला इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्याला मरेपर्यंत मारले. इकडे रहबामने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमला पळून गेला.

19तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी वैर आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Chronicles 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran