Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Samuel 5 >> 

1इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्याला म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच रक्तमांसाचे आहोत.

2शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तूच युध्दात आमचे नेतृत्व करत होतास इस्राएलांना युध्दावरून तूच परत आणत होतास. खुद्द परमेश्वर तुला म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”

3मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

4दावीद राज्य करायला लागला तेव्हा तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.

5हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरुशलेम मधून राज्य केले.

6राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करु शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हाला थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.”

7तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले.

8दावीद त्यादिवशी आपल्या लोकांना म्हणाला, यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली.

9दावीदाचा मुक्काम किल्यात होता व त्याचे नाव दावीदपुर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.

10सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.

11सोरेचा राजा हीराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.

12तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे हे ही त्याला उमगले.

13हेब्रोनहून आता दावीद यरुशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि बायका होत्या. यरुशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.

14त्याच्या या यरुशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,

15इभार, अलीशवा, नेफग, याफीय,

16अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.

17दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्याला शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरुशलेम येथील किल्ल्यात आला.

18पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

19दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करु का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”

20तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, खिडांर पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला. म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजेच खिडांर पाडणारा प्रभू असे ठेवले.

21पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ति त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या माणसांनी त्या तेथून हलवल्या.

22पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

23दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.

24तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हाला झाडाच्या शेंड्यावरुन ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”

25दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गेबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Samuel 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran